रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा

शाळेचा इतिहास

दि. २९ सप्टेंबर १८८४ विजयादशमीच्या मुहूर्तावर गव्हर्नर सर जेम्स फर्गसन यांच्या हस्ते ‘हायस्कूल फोर नेटिव्ह गर्ल्स’ संस्थेचे उदघाटन झाले. दि. २ ऑक्टोबर १८८४ पासून वाळवेकर वाड्यात वर्ग सुरु झाले. दि. १७ नोव्हेंबर १८८४ मध्ये किबे वाड्यात वर्ग सुरु झाले. दि. ४ मार्च १८८५ रोजी सांगलीचे श्रीमंत तात्यासाहेब पटवर्धन यांच्या मालकीच्या ‘हुजूरपागा’ या वास्तूत शाळेच्या इमारतीची कोनशिला सर जेम्स फर्गसन यांच्या हस्ते बसविण्यात आली.
रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांनी प्राथमिक विभाग सुरु करण्यासाठी त्याकाळी पाच हजार रुपये देणगी दिली.
सन १९०७ साली प्राथमिक शाळा व मुलींना खेळण्यासाठी प्लेशेड बांधण्यात आले. प्राथमिकचे वर्ग सुरु झाले. शाळेच्या आवारात ‘आमराईत’ सन १९७८ मध्ये शाळेची नवीन इमारत बांधण्यात आली. दि. १३ जुलै १९७९ पासून आत्ताच्या वास्तूत प्राथमिक शाळा भरू लागली.
दि. २ ऑक्टोबर १९८३ मध्ये शाळेला रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा असे नाव रँ. र. पु. परांजपे यांच्या कन्या श्रीमती. शकुंतलाताई परांजपे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

इयत्ता
१ ली ते ४ थी

वयोगट
६ वर्षे ते १० वर्षे

माध्यम
मराठी व सेमी इंग्रजी

शाळा प्रवेश
इयत्ता पहिलीपासून सुरु

शाळेची वेळ
दररोज सकाळी ११ ते ४.३० व शनिवारी सकाळी ९ ते १२.३०

पालकांसाठी शाळेत भेटण्याची वेळ
गुरुवार सायं. ४.३० ते ५.०० वाजता व शनिवारी दु. १२ वाजता

संपर्कासाठीचा पत्ता व फोन
६८९, नारायण पेठ, पुणे-३०.

शाळेचा संपर्क क्र. - ०२० २४४५६२९०

ईमेल - huzurpaga1884@gmail.com

मुख्याध्यापिका
श्रीमती उन्नती जावडेकर

शिक्षक - २२
शिक्षकेतर कर्मचारी - २ लेखनिक, ३ सेवक, ३ सफाई कामगार.
एकूण विद्यार्थी - १२३७

शाळेत शिकविले जाणारे विषय
मराठी, गणित, परिसर, इंग्लिश, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण
(इयत्ता १ ली ते ४ थी चे प्रत्येकी ४ वर्ग हे सेमी इंग्रजी चे आहेत)

शालेय उपक्रम

मागील वर्षांचे शालेय उपक्रम

गेली अनेक वर्षे आपली रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळा पालवी हा आपला वार्षिक अंक प्रकाशित करत असते. तो शाळेतल्या सर्व विद्यार्थिनींना,मान्यवर पदाधिकाऱ्यांना , शाळेत येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना, निमंत्रितांना भेट दिला जातो.

या अंकामध्ये विद्यार्थिनी, पालक, शिक्षक यांचे लेख, कविता तसेच वर्षभरातील शालेय उपक्रमांचा,उल्लेखनीय बाबींचा आढावा घेतलेला असतो.

यावर्षी प्रथमच आपण हा अंक आपल्या हुजूरपागेच्या वेबसाईटवर ठेवत आहोत. हा अंक बघण्यासाठी या मुखपृष्ठावर जो QR कोड दिलेला आहे तो आपण स्कॅन करावा व आभासी स्वरूपात असणारा अंक आपण पहावा.

या पुस्तकात विविध ठिकाणी QR कोड दिलेले आहेत. ते आपण स्कॅन केल्यास आपणास आमची पालवी प्रत्यक्ष बोलत असल्याचा अनुभव घेता येईल.

आपणास हा अंक कसा वाटला? याबद्दल प्रतिक्रिया नक्की कळवा. त्यासाठी पान नंबर ८० वर एक QR कोड दिलेला आहे, तो स्कॅन करून आपला अभिप्राय आम्हास नक्की कळवा.

आम्ही वाट पाहत आहोत.

धन्यवाद!

दिवाळी

शुक्रवार दि. २५/११/२०२४ रोजी शाळेत मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. विद्यार्थिनीं नटून थटून आल्या होत्या. इ. २ री च्या विद्यार्थिनींनी दिवाळी निमित्त फटाके विरहित दिवाळी कशी साजरी करावी यासंबंधित पथ नाट्यातून सर्व विद्यार्थिनींना संदेश दिला. शाळेत केलेला किल्ला त्यावर पणत्या लावल्या. आकाशकंदील लावण्यात आले. सर्व शाळा सजवली. विद्यार्थिनींना चिवडा लाडू फराळ देण्यात आला. या कार्यक्रमामध्ये तिनंही पालक संघातील महिला सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.



दसरा आणि खंडेनवमी

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा सण त्याआधी येणारी खंडेनवमी. शुक्रवार दि. ११ ऑक्टोंबर यादिवशी शस्रपूजन तसेच विद्यार्थिनींनी पाटीवर सरस्वती काढून पाटीपूजन केले आणि विद्यार्थिनींना या सणाची माहिती सांगितली.

भोंडला

आश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करतात. घरोघरी, सार्वजनिक मंडळे देवीची स्थापना करून दुर्गा पूजेचे आयोजन केले जाते. आपल्या या संस्कृतीची आणि परंपरेची माहिती विद्यार्थिनींनी मिळावी या उद्देशाने दरवर्षी आपल्या शाळेत भोंडल्याचे आयोजन केले जाते. शुक्रवार दि. ११ ऑक्टोंबर या दिवशी विद्यार्थिनींनी आवडीचा पोशाख परिधान करून हत्तीभोवती फेर धरून भोंडल्या निमित्त पारंपारिक व आधुनिक गाणी शिक्षकांसमवेत म्हटली. त्यानंतर सर्व विद्यार्थिनींनी खिरापतीचा आनंद घेतला. या कार्यक्रमामध्ये पालक संघातील महिला सदस्या देखील सहभागी झाल्या होत्या.

शिक्षक दिन

दिनांक ५ सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या शाळेत दि. ०५/०९/२४ रोजी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थिनी दिन साजरा करण्यात आला. या दिवशी इ. चौथीच्या निवडक विद्यार्थिनी, इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथीच्या वर्गांवर शिक्षिका म्हणून शिकविण्यासाठी गेल्या होत्या. या चौथीच्या विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका, लेखनिक, सेविका इ. भूमिकाही योग्यप्रकारे पार पडल्या. तसेच शाळेतील मा. माजी मुख्याध्यापिका व माजी शिक्षिका यांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच या दिवशी आपल्या शाळेतील शिक्षिका श्रीम. मोनिका नेवासकर बाईना पुणे महानगरपालिका आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला.

स्वराज्यसभा- निवडणूक प्रक्रिया

दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेत स्वराज्यसभा अंतर्गत निवडणुका दि. १३ जुलै २०२४ रोजी घेण्यात आल्या . लोकशाहीची बीजे लहान वयात रुजविण्यासाठी आणि उत्तम नेतृत्व तयार होण्यासाठी तसेच भारताचे सुजाण नागरिक शालेय वयापासूनच तयार व्हावे यासाठीच या निवडणूका घेण्यात येतात. निवडणूक अधिकारी, पोलीस तसेच उमेदवार अशा पोशाखात विद्यार्थीनी हजर होत्या. सर्व वर्गातील मुली उत्साहाने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थीनींनी गुप्त मतदानाने आपल्या प्रतिनिधींना निवडून दिले. अतिशय उत्साही आणि शिस्तबद्ध वातावरणात या निवडणुका पार पडल्या.

श्रावणी शुक्रवार

शुक्रवार दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी शाळेत श्रावणी शुक्रवार व हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास मा. शुभांगी चव्हाण (सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, शिक्षण मंडळ पुणे म.न.पा.) उपस्थित होत्या. शिक्षकांनी अतिशय रंजक पद्धतीने श्रावणी शुक्रवारची गोष्ट विद्यार्थिनींना सांगितली. तसेच या कथेतून मुलींनी कष्टाचा वसा घ्यायला हवा हेही सांगितले. देवीचा प्रसाद म्हणून मुलींना खारदाणे व फुटाणे देण्यात आले.

अनोखे रक्षाबंधन

दि. २६/०८/२०२४ या दिवशी आपली रक्षा करणाऱ्या पोलिसांना राखी बांधून इ. चौथीच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधन साजरे केले. फरासखाना पोलिस स्टेशन, पुणे येथील पोलिस अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींशी सुरक्षितते विषयी संवाद साधला.

पुस्तकहंडी

शनिवार दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी आपल्या शाळेत पुस्तकहंडी साजरी करण्यात आली. इ. ४ थी च्या विद्यार्थिनींना दही हंडीचा प्रसाद म्हणून गोष्टींची पुस्तके वाचनासाठी दिली गेली. इ .१ ली ते ४ थी च्या मुली राधा – कृष्ण आणि गोपींचा वेश परिधान करून आल्या होत्या. सर्व इयत्तेच्या विद्यार्थिनींनी फेर धरून दही हंडीची पारंपारिक गाणी म्हटली. अतिशय मंत्रमुग्ध वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

नागपंचमी

दि. ३ ऑगस्ट २०२४ या दिवशी आम्ही नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही तर स्वतः मातीचा नाग बनवून त्याची पूजा करू आणि इतरांनाही करायला सांगू असे म्हणत इ.३ री ४ थी च्या मुलींनी पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेतली. कात्रज सर्पोद्यानातील सर्पमित्र श्री. श्रीराम शिंदे यांनी विद्यार्थिनींना पर्यावरणपूरक माहिती दिली.

क्रांतिसप्ताह

या दिवशी आपल्या शाळेत शिक्षण सप्ताह अंतर्गत क्रांतीसप्ताह सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी क्रांतीकारकांच्या फोटोंचे पूजन करून, विद्यार्थिनींकरिता विविध उपक्रमाचे आयोजन करून गोष्टी सांगण्यात आल्या.

दीप अमावस्या

शनिवार दि. ०३/०८/२०२४ या दिवशी दीप अमावस्या साजरी करण्यात आली. या दिवशी दुसरीच्या मुलींनी विविध प्रकारचे दिवे आणले होते. ऑफिसबाहेर दिव्यांचे प्रदर्शन भरवून पूजा करण्यात आली. मुलींना विविध दिव्यांच्या प्रकारांची ओळख करून देण्यासाठी प्रत्यक्ष दिवे, त्यांची चित्रे मांडण्यात आली. मुलींना पारंपारिक दिव्यांचे प्रकार व आधुनिक दिवे यांची माहिती सांगण्यात आली. विजेची बचत करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मा. मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री मुजुमलेबाई यांनी दीपपूजन केले.

बालसभा

गुरुवार दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती या निमित्ताने ही सभा पार पडली. या संपूर्ण बालसभेचे कामकाज वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इ. चौथीच्या सर्व वर्गांतील विद्यार्थिनींनी पाहिले. त्यानंतर कु. गार्गी राऊतने प्रमुख पाहुणी असलेल्या कु. शांभवी टंकसाळे (उत्तम जलतरण पट्टू) या विद्यार्थिनीची ओळख करून दिली. कु. शांभवी टंकसाळेने बालसभेमध्ये तिच्या प्रेरणादायी भाषणातून इ. चौथीच्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. मा. मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री मुजुमलेबाई यांनी तिचे स्वागत केले.

गुरुपौर्णिमा

सोमवार दि.२२ जुलै २०२४ रोजी आपल्या शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. शाळेत महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन मा. मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री मुजुमलेबाई तसेच जेष्ठ शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. इ. ३ री चे शिक्षक आणि विद्यार्थिनींनी गुरूपौर्णिमेनिमित्त शाळेतील शिक्षकांसाठी वैशिष्ट्यपूर्ण भेटकार्ड तयार केले. ते शाळेतील मा. मुख्याध्यापिका तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर या सर्वांना देण्यात आले. त्यानंतर प्रत्येक वर्गात गुरूंच्या गोष्टी विद्यार्थीनींनी सांगितल्या.

फलकलेखन कार्यशाळा

दि. १४/०६/२०२४ रोजी सर्व शिक्षकांसाठी सुंदर हस्ताक्षर व उत्कृष्ट फलक लेखन कार्यशाळेचे आयोजन मा. मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री मुजुमलेबाई यांनी केले. या कार्यशाळेत वातावरण निर्मितीसाठी बोलके फलक लेखन प्रभावीपणे कसे करावे यासंबंधी श्री. बाळकृष्ण मुजुमले सरांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

विद्युत सुरक्षा सप्ताह

विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त दि. २७ जून २०२४ या दिवशी इ. ३ री ४ थी च्या विद्यार्थीनींमध्ये विद्युत वापराबाबत जागरुकता निर्माण व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुलींना समजेल या भाषेत व्हिडिओ, कार्टून्सच्या माध्यमातून सुरक्षेविषयी धडे देण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री मुजुमलेबाई, मिशन इलेक्ट्रिकल एम्पायरचे संस्थापक किशोर कुलकर्णी, करंट केअरच्या संचालिका गायत्री कुलकर्णी, विद्युत निरीक्षण विभागाच्या सहाय्यक अभियंता सावनी बोरकर व शुभांगी कांबळे उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय योगदिन

दरवर्षी २१ जून हा दिवस सर्वत्र आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात येतो. आरोग्याच्या दृष्टीने योगासनांचे अनन्य साधारण महत्व आहे. म्हणूनच आपल्या रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळा, हुजुरपागा येथे योगदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

इ.३ री व ४ थी च्या विद्यार्थीनींनी अमृत महोत्सव या भव्य सभागृहात तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय पूरक वातावरणात योगासने केली. मुलींसोबत मा. मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री मुजुमले व इतर शिक्षकांनीही आसनांचे प्रात्यक्षिक केले. सर्व विद्यार्थीनींनी व शिक्षकांनी रोज योगासने करण्याची खात्री मार्गदर्शकांना दिली.

इ. १ ली व २ री च्या चिमुकल्यांनीही सोपी पण महत्त्वपूर्ण योगासने आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. अशा प्रकारे उत्साहपूर्ण वातावरणात हा दिवस पार पडला.

Navagatanche swagat Navagatanche swagat Navagatanche swagat Navagatanche swagat Navagatanche swagat

पालखी सोहळा

रँ.र.पु.परांजपे प्राथमिक शाळा, हुजुरपागा लक्ष्मी रोडच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शनिवार दि. ६ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा साजरा करण्यात आला.

वारी शिक्षणाची साजरी करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी अशा थोर व्यक्तींच्या वेशभूषेमध्ये आपल्या विद्यार्थीनी आल्या होत्या. शिक्षणाच्या वारीसोबतच वारकरी संप्रदायाच्या परंपरेची जोड असणाऱ्या वारीत विठ्ठल रखुमाई तसेच संत तुकाराम, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत चोखामेळा, संत निवृत्ती महाराज या विविध संतांच्या वेशभूषा चिमुकल्यांनी केल्या होत्या. विठूनामाच्या जय घोषात मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याची सुरुवात झाली.

शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती जयश्री मुजुमले यांच्या मार्गदर्शनाखाली वारी शिक्षणाची या अनोख्या विषयाचे आयोजन केले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मुलींशी संवाद साधला. शिक्षणाच्या वारीनिमित्त शालेय सजावटी सोबतच विद्यार्थिनींची प्रभात फेरी काढण्यात आली . यावेळी शिक्षणाचे महत्व सांगणाऱ्या भेटकार्डांचे वाटप केले. तसेच तिसरीच्या विद्यार्थिनींनी शिक्षणाच्या संदेश फलकासह साक्षरता जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले.

अतिशय मंगलमय व भक्तीमय वातावरणात विठ्ठलाच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.

Palkhi Sohala Palkhi Sohala

नवागतांचे स्वागत २०२४-२५

ज्ञानाची पूजा करितो आम्ही शारदेचे पुजारी |

स्वागत आपुले करितो या शारदेच्या दारी |

उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर शनिवार दि . १५ जून २०२४ रोजी शाळा सुरू झाली. रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा लक्ष्मी रोडच्या सुकन्यांचे बालगीतांच्या सुरेल स्वरांनी स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती जयश्री मुजुमले यांनी मुलींचे औक्षण करून मुलींना सुकामेवा, मनुके देऊन त्यांचे तोंड गोड केले.

Navagatanche swagat Navagatanche swagat Navagatanche swagat

उत्सव लोकशाहीचा

लहानपणापासूनच विद्यार्थिनींना राजकारणाचे, उमेदवार निवडीचे, नेतृत्वाचे गुण वृद्धिंगत व्हावेत यासाठी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेने गुप्त मतदान पद्धतीने निवडणुका घेतल्या. स्वराज्यसभेतील नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ गुरुवार दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ रोजी घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय उपाध्यक्षा भा.ज.पा. महिला मोर्चा व सेवासदन अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्या माननीय डॉ. मेधा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. नवनिर्वाचित मंत्रिमंडळास पंतप्रधान, उपपंतप्रधान, शिस्तमंत्री, अभ्यासमंत्री, तंत्रज्ञान मंत्री, आरोग्य मंत्री, पुस्तक मंत्री अशा विविध पदांचा कार्यभार पार पाडण्यासाठी शपथविधीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीम.जवळेकर बाई यांनी मंत्रिमंडळास शपथ दिली. स्वराज्यसभेच्या प्रमुख श्रीम.बिना शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

त्यावेळी बोलताना मेधाताईंनी एवढ्या लहान वयात मुलींना निवडणुकीसारखे अनौपचारिक शिक्षण दिले याबद्दल शाळेचे कौतुक केले व विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन केले.

Lokshahi utsav Lokshahi utsav

उत्साह शिक्षणाचा, आनंद पालखीचा

|| विठूचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला ||

|| वाळवंटी चंद्रभागेच्या, काठी डाव मांडीला ||

शाळा सुरू झाल्या आणि आषाढ महिन्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी पुण्यातून प्रस्थान ठेवल्यानंतर शालेय उपक्रमांना सुरुवात होते ती पालखीने. याचा प्रत्यय आज रॅंग्लर र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेतील पालखी सोहळ्याने दिला.

सकाळपासूनच शाळेतील सर्व वातावरण भक्तिमय झाले होते. विद्यार्थिनींनी पांडुरंग, रुक्मिणी, ज्ञानेश्वर, तुकाराम, सावतामाळी, नामदेव, मुक्ताबाई असा पेहराव करून आल्या होत्या. काही विद्यार्थिनी पुरुष वारकरी तर काही स्त्री वारकऱ्यांचेही पेहराव करून तुळशी वृंदावन घेऊन आल्या होत्या. पालखीचे व ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या मूर्तींचे पूजन झाल्यावर शाळेतील पालखीने प्रस्थान ठेवले आणि बाहेरच्या रस्त्यावरून संपूर्ण हुजूरपागेच्या परिसरात विठ्ठल नामाच्या गजरासह ज्ञानोबा माऊलींचा जयघोष केला.

या पालखी सोहळ्यामध्ये ग्रंथ दिंडी, वृक्षदिंडी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पाच दिंड्या होत्या. विद्यार्थिनींनी त्या त्या दिंड्यांप्रमाणे फलक हातात घेतले होते. "वृक्षारोपणाचे महत्त्व" पटवून देण्यासाठी काही मुलींनी झाडांची रोपे माणसांना दिली तर "प्लास्टिकचा वापर टाळा" असा नारा देत कापडी पिशव्यांचे ही वाटप विद्यार्थिनींनी या दिंडी मधून केले.

या सर्व चिमुकल्या वारकऱ्यांचे कौतुक रस्त्यावरील सर्व माणसे करत होती. मुलींबरोबर टाळ्या वाजवत घोषणा देत होती. संपूर्ण परिसराला वेढा मारून आल्यानंतर शाळेच्या प्रांगणात छोटेखानी रिंगण झाले आणि साखर फुटाण्याचा सर्वांना प्रसाद देऊन पालखीची सांगता करण्यात आली. या सर्व कार्यक्रमाला मार्गदर्शन माननीय मुख्याध्यापिका श्रीमती जावडेकर बाईंनी केले.

Palkhi Palkhi Palkhi

योगदिन उत्साहात साजरा..

२१ जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून रँग्लर र.पु.परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा लक्ष्मी रोड येथे इयत्ता तिसरी व चौथीच्या सुमारे ५९५ विद्यार्थिनिनी विविध प्रकारची योगासने करून मोठ्या उत्साहात योगदिन साजरा केला.

आज संपूर्ण जगाने स्वीकारलेला योगा हा भारतीय संस्कृतीत खूप जुन्या काळापासून चालत आला आहे. शालेय जीवनात लहानपणापासून अभ्यासातील एकाग्रता टिकविण्यासाठी तसेच शरीर, मन यांच्या उत्तम आरोग्यासाठी शालेय विद्यार्थ्यानी योग, आसने करणे अतिशय फायद्याचे ठरते. शाळेच्या मुख्या. मा. उन्नती जावडेकर यांनी याप्रसंगी मुलींना योगाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन दिले.

Yoga Day 2023