शालेय उपक्रम २०१९ - २०२०
पालखी सोहळा
सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती | रखुमाईच्या पती सोयरिया ||
गोड तुझे रूपं गोड तुझे नाम | देई मज प्रेम सर्व काळ ||
पंढरीची वारी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे अध्यात्मिक सांस्कृतिक वैभव. लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखी बरोबर मुखी विठ्ठल नामघोष करीत उत्साहाने, आनंदाने शिस्तीत वारीत सामील होतात. हा भक्तिरसाचा वारसा विद्यार्थिनींनी मधे रुजविण्यासाठी शाळेत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी दिंडी, वृक्ष दिंडी, डिजिटल दिंडी, पर्यावरण दिंडी, जलदिंडी अशा विविध दिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते.
पालक शाळा
इ. १ ली ते ७ वी च्या सर्व वर्गांच्या पालक सभा झाली. पालक सभेत साधारणपणे शाळेच्या शिस्तीचे नियम, विविध उपक्रमांची माहिती, अभ्यासक्रम, व शालेय शैक्षणिक धोरणाला अनुसरून इतर अनेक विषयांवर चर्चा घेण्यात आली. पालकांनी या पालक सभांना उत्तम प्रतिसाद दिला.
योग दिवस
हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शरीर आणि मन निरोगी रहाण्यासाठी योगासने, प्राणायाम करण्याची गरज असते. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये ताडासन, वृक्षासन, पद्मासन, भुजंगासन, नौकासन तसेच प्राणायाम इ. घेण्यात आले. त्यामध्ये सर्व विद्यार्थिनी, शिक्षक सहभागी झालेले होते. मा. मुख्याध्यापिका श्रीम. रंजना नाईक, क्रीडाशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योगदिन खुप उत्साहात, जोशात साजरा झाला.
नवागतांचे स्वागत
मे महिन्याची सुट्टी संपली की ओढ लागते ती शाळेची! नवीन दप्तर, नवीन पुस्तके, वह्या आणि नवीन शाळा!! इयत्ता पहिलीत प्रवेश घेणार्या चिमुकल्यांना अशीच नाविन्याची ओढ असते. शाळेत आलेल्या या नवागतांचे स्वागत करण्यास वर्ग खोल्या सजल्या होत्या. विद्यार्थिनींना नवीन पुस्तके दिलीत. खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस म्हणून बुद्धि देवता शारदा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.