शालेय उपक्रम २०१६ - २०१७
शैक्षणिक सहली (२०१६-१७)
सन २०१६ - १७ या वर्षातील शैक्षणिक सहलींचे आयोजन खालील प्रमाणे करण्यात आले होते.
सहल यशस्वी होण्यात वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. मा. मुख्याध्यपिका श्रीमती रंजना नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहल विभागाने काटेकोर नियोजन केले होते. तसेच सर्व सहकारी शिक्षकांचे सहकार्य व विद्यार्थिनींची शिस्त यामुळे नियोजनाची अचूक अंमलबजावणी करता आली. व सर्व सहलीतील विद्यार्थिनींना पर्यटनाचा पुरेपूर आनंद घेता आला.
भारतीय संविधान दिवस (२६ नोव्हेंबर २०१६)
दि. २६ नोव्हेंबर हा दिवस भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस होय या दिवशी म्हणजेच दि. २६ नोव्हें १९५० रोजी भारताची घटना तयार झाली. या घटनेचे शिल्पकार होते डॉ. बाबा साहेब आंबेडकर. म्हणून शाळेत २६ नोव्हें २०१६ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शिशुमंदिर विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीम. उमा गोसावी, प्राथमिक विभागाच्या जेष्ठ शिक्षिका नूतन जवळेकर यांनी केले. विद्यार्थिनींना आपले संविधान, राज्यघटना व त्यातील नागरिकांचे हक्क, कर्तव्ये, शासनव्यवस्था, मुल्ये, व उद्दिष्टे यांबाबत सविस्तर माहिती श्रीम. प्रिया गोगावले यांनी दिली. कु. रमा नलावडे इ. ५ वी अचला व कु. मानसी मरळ इ. ६ वी या विद्यार्थिनींनी संविधान दिनाबद्दल मनोगत व्यक्त केले. संविधान दिनाचे औचित्य साधून इ. ७ वी चा प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम घेण्यात आला. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद या चार गटात विद्यार्थिनींचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्रीम. सुचिता सावंत यांनी केले. तर परीक्षक म्हणून श्रीम. जवळेकर व श्रीम. गोगावले यांनी काम पहिले. सहभागी व विजयी विद्यार्थिनींना श्रीम. उमा गोसावी यांच्या हस्ते बक्षिसे दिली.
कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम्” या राष्ट्रगीताने झाली.
बाल दिन (१४ नोव्हेंबर २०१६)
बच्चे मनके सच्चे सारी दुनियाके ऑंखों के तारे | ये जो नन्हे फूल भगवान को लगते प्यारे || या ओळींप्रमाणे लहान मुलं सर्वांनाच आवडतात. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सुद्धा लहान मुलं खूपच आवडायची म्हणून त्यांचा जन्मदिवस म्हणजेच १४ नोव्हेंबर बालदिन म्हणून साजरा केला जातो. हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत बालदिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींचे विविध मनोरंजनात्मक खेळ घेतले. इ. १ लीच्या शिक्षकांनी इ. १ ली च्या विद्यार्थिनींना पपेट-शो द्वारे छान छान गोष्टी सांगितल्या. तर इ. ३ रीच्या सर्व विद्यार्थिनींची पोत्याची शर्यत घेण्यात आली. इ. ४ थीच्या विद्यार्थिनींचा फुग्याचा खेळ घेण्यात आला. असे प्रत्येक इयत्तेने विविध मनोरंजनात्मक खेळ घेऊन विद्यार्थिनींचा उत्साह वाढवला.
ज्ञानरचनावाद - कार्यशाळा (ऑक्टोबर २०१६)
विद्यार्थ्यांचा भाषिक विकास व गणित कौशल्य विकसित करण्यासाठी अध्ययन अध्यापनासाठी रचानावाद सिद्धांत फायदेशीर ठरू लागला आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात ह्या ज्ञानरचनावादाने विद्यार्थ्यांची भाषिक व गणित कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्या शाळेतील शिक्षकांनी वाई तालुक्यात शाळांना भेट देऊन तेथे चालू असलेला हा स्तुत्य उपक्रम आपल्या हुजूरपागेच्या इतर विभागातील शिक्षकांना कार्यशाळे द्वारे उत्तम प्रकारे समजावून सांगितला. ह्या मध्ये ज्ञानरचानावादाचे नेमके स्वरूप शिक्षकाची भूमिका, वर्गखोलीची रचना हे विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट करण्यात आली.
गणित जत्रा (ऑक्टोबर २०१६)
इ. ५ वी अचला च्या वर्गात गणित विषयावर आधारित मनोरंजनात्मक गणित जत्रा हा प्रकल्प शाळेतील सहशिक्षिका श्रीम. प्रिया गोगावले यांनी घेतला. या मध्ये विद्यार्थिनींनी बेरीज, वजाबाकी, सम-विषम, खरेदी-विक्री, पाढ्यांची गंमत, नफा – तोटा आदींवर आधारित गमतीदार खेळ स्वत:च्या कल्पकतेने सादर केले. सर्व विद्यार्थिनींनी, मा. मुख्याध्यापिका श्रीम. रंजना नाईक तसेच इ.१ ली ते ४ थी. च्या सर्व शिक्षकांनी या खेळाचा आनंद घेतला.
शुभ दीपावली (२१ ऑक्टोबर २०१६)
यशाची रोषणाई
समाधानाचा फराळ मंगलमय रांगोळी
मधुर मिठाई आकर्षक आकाशकंदील
आकाश उजळवणारे फाटके
२१ ऑक्टोबर रोजी हुजूरपागा कात्रज प्राथमिक विभागात मोठ्या उत्साहात व आनंदात फाटके विरहीत दिवाळी साजरी करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थिनीला एक पणती आकाशकंदील व लाडू चिवडा शाळेकडून दिवाळीची भेट म्हणून देण्यात आले. विद्यार्थिनींनी मिळालेली पणती सुरेख रंगवली व त्याच पणत्या वापरून दिव्यांची रोषणाई केली, मोठ्ठी रांगोळी काढून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
वाचन प्रेरणा दिन (१५ ऑक्टोबर २०१६)
१५ ऑक्टोबर हा अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. अब्दुल कलाम हे हाडाचे शिक्षक होते. यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी आवर्जून पुस्तके वाचली. इ. १ ली व २ री च्या विद्यार्थिनींना गोष्टीची पुस्तके वाचण्यास दिली. तसेच इ. ५ ते ७ च्या विद्यार्थिनींनी अब्दूल कलमांची पुस्तके वाचली. वाचन प्रेरणा दिनानिमित्त इ. ४ थीच्या विद्यार्थिनींनी आपल्या शालेय परिसराच्या जवळ असलेल्या शाळांना भेट दिली. स्व. रामभाऊ म्हाळगी या शाळेच्या माध्यमिक विभागाच्या ग्रंथालयाला भेट दिली तसेच तेथील मुख्याध्यपिकांची मुलाखत घेतली.
खंडेनवमी आणि पाटीपूजन (१० ऑक्टोबर २०१६)
| उत्सव आला विजयाचा दिवस सोनं लुटण्याचा |
सोमवार दि. १०/१०/२०१६ रोजी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत खंडेनवमी आणि पाटीपूजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. इ. १ ली ते इ. ४ थी च्या विद्यार्थिनी या दिवशी आवडीचा पोशाख घालून आल्या. १ ली ते ४ थीच्या सर्व विद्यार्थिनींनी पाटीवर सरस्वती काढून पूजन केले. त्याच प्रमाणे मा. मुख्याध्यपिका श्रीम. रंजना नाईक व इतर शिक्षकांनी शाळेतील सर्व लोखंडी वस्तू व शस्त्रांची पूजा केली. या उपक्रमाची माहिती शाळेतील सहशिक्षिका श्रीम. ताम्हाणे यांनी माईकवरून सर्व विद्यार्थिनींना सांगितली.
भोंडला (१० ऑक्टोबर २०१६)
ऐलोमा पैलोमा गणेश देवा |
माझा खेळ मांडीयेला करीन तुझी सेवा ||
हे गाणं ऐकलं कि आठवतो तो भोंडला. अश्विन प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत जे देवीचे नवरात्र साजरे होते, त्या नऊ दिवसांत भोंडला साजरा करतात. भोंडल्यालाच हादगा असेही म्हणतात. हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करून फेर धरून विविध गाणी म्हणतात व प्रत्येकीने आणलेली खिरापत ओळखतात. असा हा भोंडला हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थिनी आवडीचा पोशाख घालून आल्या होत्या. इयत्तेनुसार इ. १ ली ते ७ वी च्या सर्व विद्यार्थीनींना फेर धरून गाणी म्हणण्यासाठी प्लेशेड मध्ये पाठविण्यात आले. सुरवातीलाच मा. मुख्याध्यपिका रंजना नाईक यांनी हत्तीच्या प्रतिमेचे पूजन केले. श्रीम. साठेबाई व श्रीम. देशमुखबाई यांनी मुलींना भोंडल्याची माहिती सांगून गाणी म्हटली. गाणी संपल्यावर मुलींनी खिरापत ओळखली. सर्व मुलींना खिरापत वाटण्यात आली. अशा प्रकारे पारंपारिक संस्कृती जपणारा भोंडला आमच्या शाळेत आनंदाने साजरा करण्यात आला.
शिक्षकदिन (५ सप्टेंबर २०१६)
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ते थोर विद्वान व हाडाचे शिक्षक होते. आपल्या शिकविण्याच्या विशीष्ट शैलीतून त्यांनी भावी सर्व शिक्षक परिवारासाठी आदर्श घालून दिला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत सुद्धा शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. इ. ७ वीच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन मुख्याध्यपिका, पर्यवेक्षक, लेखनिक, शिपाई यांची भूमिका अगदी चोख पार पाडली. तसेच काही विद्यार्थिनी कात्रज विभागातील शिशुमंदिर विभागात शिक्षिका म्हणून गेल्या होत्या.
ज्या विद्यार्थिनी शिक्षिका झाल्या होत्या त्यांनी आपले अनुभव सांगितले. त्यांना शाळेकडून खाऊ वाटप करण्यात आला.
श्रावणी शुक्रवार (२६ ऑगस्ट २०१६)
निसर्गाचे आपल्यावर अगणित ऋण आहे. याच ऋणाची जाणीव व्यक्त करण्यासाठी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेमध्ये वसुंधरा पूजनाचा तसेच निसर्ग पूजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सूर्य, झाड, आकाश, पाणी, फूल, यांच्या प्रतिकृती तयार करून त्यांचे पूजन करण्यात आले. निसर्गातील या देवतांची माहिती व महत्त्व विद्यार्थिनींना सांगण्यात आले. याच दिवशी इ. ३ री व इ. ४ थी च्या विद्यार्थिनींनी आदिशक्तीचे पूजन करून भक्तिमय वातावरणात श्रावणी शुक्रवार साजरा केला. श्रावणी शुक्रवारची कहाणी सांगण्यात आली तसेच देवीची आरती, गजर घेण्यात आला व प्रसाद वाटण्यात आला. याच दिवशी इ. ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थिनींसाठी खेळ मंगळागौरीचे हा कार्यक्रम आयोजित केला होता. शाळेतील ग्रंथपाल श्रीम. जयश्री कुलकर्णी यांच्या सखी मंगळागौर या ग्रुपने अतिशय उत्तम, रंजक असे मंगळागौरीचे खेळ सादर केले.
पुस्तकहंडी (२६ ऑगस्ट २०१६)
दहीहंडीचे औचित्य साधून शुक्रवार दि. २६ ऑगस्ट रोजी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत पुस्तकहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. इ. ६ वी च्या विद्यार्थिनींचा यात सहभाग होता. श्रीम. मोनाली तनपुरे यांनी दहीहंडी विषयी माहिती सांगितली व मा. मुख्याध्यापिका श्रीम. रंजना नाईक यांच्या कल्पनेतून इ. ६ वी च्या सर्व विद्यार्थिनींना शाळेकडून पुस्तक कायमस्वरूपी भेट देण्यात आले. सर्व पुस्तके एकमेकींना हस्तांतर करून वाचन करण्याचे आवाहन करण्यात आले.
नागपंचमी (१९ ऑगस्ट २०१६)
'निसर्ग आपुला सखा सोबती' या उक्ती प्रमाणेच 'निसर्गातील सर्व प्राणीमात्रांवर द्या करा' असे सांगणारा नागपंचमी हा सण शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नागपंचमी निमित्ताने पालक, विद्यार्थिनी व शिक्षक यांची मेंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली. इ. ७ वीच्या विद्यार्थिनींनी इ. १ लीच्या विद्यार्थिनींच्या हातावर मेंदी काढली.
राखी पौर्णिमा (१६ ऑगस्ट २०१६)
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला श्रावण
लाख लाख शुभेच्छा
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण ||
अशाप्रकारे भाऊबहिण यांच्या नात्याची वीण अधिकाधिक घट्ट करणारा सण म्हणजेच राखी पौर्णिमा. दि. १६ ऑगस्ट रोजी हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व काही विद्यार्थिनी पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे सकाळी ८.४५ वाजता उपस्थित राहिल्या. शाळेतील कला शिक्षिका श्रीम. गजमल यांनी विद्यार्थिनींकडून सुरेख राख्या तयार करून घेतल्या होत्या. त्याच राख्या विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी पोलिसांना बांधल्या, औक्षण केले व प्रत्येकाचे तोंड गोड केले. विद्यार्थिनी व शिक्षकांसाठी हा अनोखा अनुभव होता. तेथील श्री. श्रीकांत शिंदे यांनी आमच्या सर्व विद्यार्थिनींना पोलिस स्टेशनचे कामकाज कसे चालते ते सविस्तर सांगितले. वॉकी –टॉकीवरचे प्रत्यक्ष बोलणे एकून तर विद्यार्थिनी हरखूनच गेल्या. पोलिसांजवळ असलेल्या विविध बंदुकांची माहिती त्यांनी विद्यार्थिनींना दिली. व त्या सर्व बंदुकी विद्यार्थिनींना पाहिला मिळाल्या. तसेच त्या स्टेशनच्या अखत्यारीत असलेल्या सर्व चौकातील रहदारी CCTV कॅमेऱ्याने तेथील स्क्रीनवर बघता आली. हा सर्व अनुभव विद्यार्थिनी व शिक्षकांसाठी खूपच छान व वेगळा होता. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे मुख्य पोलिस अधिकारी SPI विजयसिंग गायकवाड यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून सामाजिक भान प्रत्येक नागरीकाला येणं किती गरजेचे आहे हे पटवून दिले.
क्रांतिसप्ताह (८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०१६)
जनन - मरण हे तुझ्याचसाठी, टिळा मातीचा लावीन माथी |
सार्वभौमत्व हे भारतभूचे, अभंग आपण राखूया,
चला चला रे तिरंगा खांद्यावर मिरवू या !!
देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या, क्रांतिकारकांच्या स्मृतीं मनात सतत तेवत राहाव्यात याच हेतूने हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत क्रांतिसप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देशप्रेम, सांघिक भावना, सामाजिक भान इ. नीतिमुल्ये विद्यार्थिनींच्या मनात रुजविली जातात. गुरुवार दि. ११ ऑगस्ट २०१६ रोजी इ. ५ वी च्या विद्यार्थिनींची कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. तसेच इ. ५ वी ते ७ वी सर्व वर्गांमध्ये क्रांतिकाराकांच्या पुस्तकांतील कथांचे वाचन घेण्यात आले. शुक्रवार दि. १२ ऑगस्ट रोजी इ. ६ वी च्या विद्यार्थिनींची निबंध स्पर्धा घेण्यात आली.
आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आपल्या भावना व्यक्त करणारे पत्रलेखन इ. ७ वी च्या विद्यार्थिनींनी केले ही पत्रं व राख्या सीमेवरील सैनिक बांधवांना पाठविण्यात आल्या. त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला गेला.
बालसभा (१ ऑगस्ट २०१६)
विद्यार्थिनींना शालेय जीवनापासूनच देशभक्तीचे बाळकडू मिळावे व प्रत्येकीच्या मनात देशभक्ती जागृत रहावी, पूर्व सुरींनी केलेले बलिदान स्मरणात रहावे इ. उद्देशांसाठी महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे आक्रमक व जहाल नेतृत्व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनी दि. १ ऑगस्ट २०१६ हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेत याच हेतूने बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील महत्त्वाचे नेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीही याच कार्यक्रमात साजरी करण्यात आली. बालसभेच्या या उपक्रमास प्रमुख पाहुणी म्हणून हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळेच्या स्वराज्यसभेतील मंत्रिमंडळाची अध्यक्ष कु. कोमल उणेचा उपस्थित होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळा स्वराज्यसभा मंत्रिमंडळ अध्यक्ष कु. आदिती किंद्रे हिने भूषविले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी इ. सातवी वसुधा या वर्गातील कु. सानिका मुसळे हिने पार पाडली. पाहुण्यांचा परिचय कु. गौरी बंगाळे तर आभार प्रदर्शन कु. कुंभार हिने पार पाडले. इयत्ता सातवीच्या काही विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक व काही विद्यार्थिनींनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाबद्दल, सामाजिक, राजकीय, कार्याबद्दल आपल्या भाषणातून माहिती सांगितली. उत्तम नियोजन, विद्यार्थिनींची उत्तम भाषणे व भारावलेल्या वातावरणात ही बालसभा यशस्वीपणे संपन्न झाली. या कार्यक्रमास हुजूरपागा कात्रज प्राथ. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. रंजना नाईक उपस्थित होत्या. सभा पार पडल्यानंतर बाईंनी सर्व विद्यार्थिनींचे कौतुक केले.
गुरुपौर्णिमा (१९ जुलै २०१६)
|| गुरु ईश्वर तात माय | गुरुविण जगी थोर काय ||
आषाढ शुध्द पौर्णिमेलाच आपण गुरु पौर्णिमा असेही म्हणतो. आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा मंगल दिवस. जीवनाच्या प्रत्येक वळणावर विविध रुपात गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात. प्राथमिक शाळेत सुद्धा गुरु पौर्णिमा अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरी झाली. मा. मुख्याध्यापिका श्रीम. रंजना नाईक यांनी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सत्कार विद्यार्थिनींच्या हस्ते श्रीफळ, फुल, व भेटवस्तू देऊन केले.
स्वराज्य सभा शपथविधी समारंभ (१६ जुलै २०१६)
विद्यार्थिनींना जबाबदार नागरिकत्वाचे बाळकडू शालेय जीवनापासूनच मिळावे या हेतूने शालेय मंत्री- मंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात येते. १ ली ते ७ वी च्या निवडून आलेल्या विद्यार्थिनी मंत्र्यांना स्वराज्य सभा शपथविधी समारंभात शपथ देण्यात येते. या समारंभास राजकारणातील व्यक्तींना शाळा आमंत्रित करते. या वर्षी दि. १६ जुलै २०१६ रोजी स्वराज्य सभा शपथविधी समारंभास पुणे शहराचे महापौर मा.श्री. प्रशांत जगताप हे प्रमुख पाहुणे लाभले. त्यांनी विद्यार्थिनींना राजकारणातील अनुभवांचे मोलाचे मार्गदर्शन केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीम. सीमा झोडगे यांनी उगवत्या मंत्रिमंडळास शपथ दिली. या कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी मा. श्रीम. संध्या गायकवाड, रत्नप्रभा जगताप, सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाशभाऊ कदम, श्रीम. राठोड बाई, श्री. घाटगे सर, पत्रकार बंधू उपस्थित होते.
रमजान ईद (८ जुलै २०१६)
हर तरफ फैले खुशियों के गीत
इसी तमन्ना के साथ
आपको मुबारक हो ईद
शुक्रवार दि. ८ जुलै २०१६ रोजी कात्रज हुजूरपागा प्राथमिक शाळा येथे ‘रमजान ईद’ चे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मा. श्री. शमशुद्दीन तांबोळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अत्यंत उत्साह पूर्वक वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. मुस्लिम पालकांना देखील या प्रसंगी आमंत्रित करण्यात आले होते तसेच पालकांचा सत्कार मा. श्री. शमशुद्दीन तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला. मा. श्री. शमशुद्दीन तांबोळी यांनी अत्यंत समर्पक शब्दांत रमजान ईद या सणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थिनी व पालकांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
पालक सभा (जुलै २०१६)
इ. १ ली ते ७ वी च्या सर्व वर्गांच्या पालक सभा जुलै महिन्यात घेण्यात आल्या. पालक सभेत साधारणपणे शाळेच्या शिस्तीचे नियम, विविध उपक्रमांची माहिती, अभ्यासक्रम व शालेय शैक्षणिक धोरणाला अनुसरून इतर अनेक विषयांवर चर्चा घेण्यात आली. पालकांनी या पालक सभांना उत्तम प्रतिसाद दिला.
पालखी सोहळा (९ जुलै २०१६)
|| विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ||
या वर्षी पालखी सोहळ्यात पारंपारिक दिंडी बरोबर जलदिंडी, वाहतुक सुरक्षा दिंडी, ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, पर्यावरण दिंडी, साक्षरता दिंडी इ. दिंडींचा समावेश होता. पुणे शहरास भेडसावणाऱ्या पाण्याच्या प्रश्नाबाबत विद्यार्थिनींनी जल दिंडीतून जनजागृती केली. झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा. असा संदेश विद्यार्थिनिंनी वृक्ष दिंडीतून दिला. वृक्ष दिंडीचे औचित्य साधून इ. ४ थीच्या विद्यार्थिनिंनी तुळशीरोपाचे राजस सोसायटी, कात्रज परिसरात वाटप केले. कापडी व कागदी पिशव्यांचे वाटप सुखसागर परिसरात करून प्लास्टिकचा वापर टाळा असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
वृक्षारोपण (१ जुलै २०१६)
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वनविभागातर्फे राबविण्यात आलेला राज्यस्तरीय वृक्ष लागवडीचा कार्यक्रम दि. १ जुलै २०१६ रोजी हुजूरपागा कात्रज विभागाच्या परिसरात राबविण्यात आला. परिसराला अनुसरून विविध रोपे लावण्यात आली लाल पिवळी कर्दळ, पानफूटी, गवती चहा, कडूलिंब यांसारखी रोपे म.ग.ए. संस्थेचे सभासद मा. सुभाष महाजन सर, प्राथमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीम. रंजना नाईक, शिशु मंदिर विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीम. उमा गोसावी तसेच प्राथमिक विभागाच्या माजी मुख्याध्यापिका मा. श्रीम. गीता बोगम यांच्या हस्ते लावण्यात आली. याच अनुषंगाने विद्यार्थिनींना झाडांचे महत्त्व पटवून दिले.
नवागतांचे स्वागत (१५ जून २०१६ )
दिनांक १५ जून २०१६ रोजी शालेय शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली. इयत्ता पहिलीतील चिमुकल्यांचे गोष्टीची पुस्तके व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. पहिलीच्या शिक्षकांनी पर्यावरणावर आधारित नाटक सादर केले.