शालेय उपक्रम २०१५ - २०१६
नवागतांचे स्वागत (१५ जून २०१५ )
नवागतांचे स्वागत (१५ जून २०१५ )
दिनांक १५ जून २०१५ रोजी शालेय शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली. इयत्ता पहिलीतील चिमुकल्यांचे गोष्टीची पुस्तके व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. पहिलीच्या शिक्षकांनी पर्यावरणावर आधारित नाटक सादर केले.
स्वराज्य सभा शपथविधी समारंभ (११ जुलै २०१५)
स्वराज्य सभा शपथविधी समारंभ (११ जुलै २०१५)
विद्यार्थिनींना जबाबदार नागरिकत्वाचे बाळकडू शालेय जीवनापासूनच मिळावे या हेतूने शालेय मंत्री- मंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात येते. १ ली ते ७ वी च्या निवडून आलेल्या विद्यार्थिनी मंत्र्यांना स्वराज्य सभा शपथविधी समारंभात शपथ देण्यात येते. या समारंभास राजकारणातील व्यक्तींना शाळा आमंत्रित करते. या वर्षी दि. ११ जुलै २०१५ रोजी स्वराज्य सभा शपथविधी समारंभास महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा.श्री. दिलीप कांबळे हे प्रमुख पाहुणे लाभले. त्यांनी विद्यार्थिनींना राजकारणातील अनुभवांचे मोलाचे मार्गदर्शन केले. प्राथमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीम. सुरेखा ओव्हाळ यांनी उगवत्या मंत्रिमंडळास शपथ दिली.
पालखी सोहळा (१७ जुलै २०१५)
पालखी सोहळा (१७ जुलै २०१५)
|| विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ||
या वर्षी पालखी सोहळ्यात पारंपारिक दिंडी बरोबर जलदिंडी, वाहतुक सुरक्षा दिंडी, ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, पर्यावरण दिंडी, इ. समावेश होता. पुणे शहरास भेडसावणाऱ्या पाण्याच्या प्रश्नाबाबत विद्यार्थिनींनी जल दिंडीतून जनजागृती केली. झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा. असा संदेश विद्यार्थिनिंनी वृक्ष दिंडीतून दिला. कापडी व कागदी पिशव्यांचे वाटप भोवतालच्या परिसरात करून प्लास्टिकचा वापर टाळा असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
रमजान ईद (१७ जुलै २०१५)
रमजान ईद (१७ जुलै २०१५)
सर्व धर्म समभावाचे दर्शन घडविणारा सण मुस्लीम बांधवांची ‘रमजान ईद’ अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. म.ग.ए. सोसायटीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. अन्वर राजन यांच्या व पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. आपल्या भाषणातून प्रमुख पाहुण्यांनी या सणाविषयी माहिती सांगितली. विद्यार्थिनी व पालकांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनींचा कौतुक सोहळा (२५ जुलै २०१५)
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनींचा कौतुक सोहळा (२५ जुलै २०१५)
हुजूरपागा कात्रज शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवाणारा असा सन २०१४-१५ शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागला. एकूण पाच विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळाली.
शिष्यवृत्ती परीक्षेत झळकलेल्या विद्यार्थिनी
इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा
- कु. वैष्णवी अमित मुधोळ - १५ वी
- कु. सिद्धी राजेश भास्कर - १५ वी
- कु. पूर्वा राजेश चरेगावकर - २१ वी
- कु. श्रेया सचिन लाड - २२ वी
इयत्ता७वीशिष्यवृत्तीपरीक्षा
- कु. स्नेहा मोतीराम पाडे -१६वी
या यशस्वी विद्यार्थिनींचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार समारंभ कार्यक्षम नगरसेविका मा.श्रीम. भारतीताई कदम यांच्या हस्ते दि. २५ जुलै रोजी संपन्न झाला. विद्यार्थिनींच्या यशात मोलाचा वाट उचलणाऱ्या त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला. या कौतुक सोहळ्यास म.ग.ए. संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारीही आवर्जून उपस्थित होते.
गुरुपौर्णिमा (३१ जुलै २०१५)
गुरुपौर्णिमा (३१ जुलै २०१५)
|| गुरु ईश्वर तात माय | गुरुविण जगी थोर काय ||
आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा मंगल दिवस शाळेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. जीवनाच्या प्रत्येक वळणावर विविध रुपात गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणूनच मा. मुख्याध्यापिका श्रीम. सुरेखा ओव्हाळ यांच्या कल्पनेतून शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूजन विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले.
बाल सभा ( १ ऑगस्ट २०१५)
बाल सभा ( १ ऑगस्ट २०१५)
लोकमान्य टिळक पुण्यतिथी या दिवसाचे औचित्य साधून इयत्ता ७ वीच्या विद्यार्थिनींनी बालसभेचे आयोजन केले. या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या थोर पुरुषांच्या जीवनातील प्रसंग कथेतून व नाटकातून विद्यार्थिनींनी सादर केले.
क्रांति सप्ताह (९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०१५)
क्रांति सप्ताह (९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०१५)
देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या, क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या क्रांती सप्ताहाचे उद्घाटन लेफ्टनंट कर्नल श्री. दिपक आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. या सप्ताहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देशप्रेम, सांघिक भावना, सामाजिक भान इ. नीतिमुल्ये विद्यार्थिनींच्या मनात रुजविली जातात.
क्रांति सप्ताहातील विविध कार्यक्रम
-
क्रांतिकारकांच्या माहितीचे प्रदर्शन
- कथाकथन स्पर्धा (क्रांतिकारकांच्या गोष्टी)
- वेशभूषा (क्रांतिकारक)
- देशभक्तीपर समूह गीत स्पर्धा
नागपंचमी (१९ ऑगस्ट २०१५)
पन्हाळा किल्ला
शिवनेरी
पन्हाळा किल्ला
नागपंचमी (१९ ऑगस्ट २०१५)
निसर्ग आपुला सखा सोबती या उक्ती प्रमाणेच निसर्गातील सर्व प्राणीमात्रांवर द्या करा. असे सांगणारा नागपंचमी हा सण शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नागपंचमी निमित्ताने पालक, विद्यार्थिनी, व शिक्षक यांची मेंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली. इ. ७ वीच्या विद्यार्थिनींनी इ. १ लीच्या विद्यार्थिनींच्या हातावर मेंदी काढली.
राखी पौर्णिमा ( २७ ऑगस्ट २०१५)
बहिण भाऊ यांच्या नात्याची वीण अधिकाधिक घट्ट करणारा हा सण. हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळेने हा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रत्येकाला सामाजिक भान आणून देणारा असा साजरा केला. दि. २७ ऑगस्ट रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर, विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक सर्वांनी लष्कराच्या अपंग विकलांग केंद्रातील सैनिकांना राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी केली.
पुस्तक हंडी (४ सप्टेंबर २०१५)
परंपरेला आधुनिकतेची झालर लावत दहीहंडी ऐवजी पुस्तक हंडी साजरी करून पुस्तकांचे महत्त्व सांगणारा हा पुस्तक हंडीचा कार्यक्रम दि. ४ सप्टेंबर २०१५ रोजी संपन्न झाला. पुस्तक हंडीचा प्रसाद म्हणून विद्यार्थिनींना विविध प्रकारची पुस्तके वाटण्यात आली.
श्रावणी शुक्रवार (४ सप्टेंबर २०१५ )
आदिशक्तीचे पूजन करून भक्तिमय वातावरणात श्रावणी शुक्रवार साजरा करण्यात आला. देवीची आरती गजर घेण्यात आला. व प्रसाद वाटप करण्यात आला.
याच दिवशी पृथ्वी मातेप्रति आपली कृतज्ञता वसुंधरा पूजनाद्वारे विद्यार्थींनीनी व्यक्त केली.
शिक्षकदिन (५ सप्टेंबर )
मिसाईल मॅन म्हणून नावाजलेल्या द्रष्ट्या शिक्षकास म्हणजे ए.पी.जे. अब्दूल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता शिक्षकदिनानिमित्त भरविण्यात आलेले विज्ञान प्रदर्शन. या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थिनींनी नाविन्यपूर्ण प्रयोग सादर केले. तसेच ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या कारकिर्दीविषयी व जीवनाविषयी चित्रफीत दाखविण्यात आली.
शिक्षक पालक संघातील पालकांनी सर्व शिक्षकांचा सत्कार करून शिक्षक दिन साजरा केला.
गणपती रंगवणे स्पर्धा (१४ सप्टेंबर २०१५)
दर वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपती रंगवणे स्पर्धा शाळेत घेतली जाते. बहुसंख्य विद्यार्थिनी या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात.
हिंदी दिवस (१४ सप्टेंबर २०१५)
दि. १४ सप्टेंबर रोजी शाळेमध्ये हिंदी दिवस उत्साहाने साजरा केला. यादिवशी शाळेमध्ये सर्वांनी हिंदी मध्ये संभाषण केले. हिंदी दिनाविषयी माहिती, गोष्टी, घोष वाक्ये इ. विद्यार्थिनींनी सांगितली.
संस्था वर्धापनदिन (२ ऑक्टोबर )
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचा १३१ वा वर्धापनदिन मोठ्या दिमाखात कात्रज विभागात साजरा करण्यात आला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, रा.गो. भांडारकर, शंकर पांडुरंग पंडित,वामन आबाजी मोडक या संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन नियामक मंडळाच्या सदस्या मा. श्रीम. हिमानी गोखले यांनी केले.
पाटी पूजन (२१ ऑक्टोबर )
विद्यार्थिनींनी पाटी पूजन करून व ‘ झाडाची पाने तोडू नका पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत दसरा हा सण साजरा केला. दसऱ्याचे पारंपारिक महत्त्व शिक्षिकांनी विद्यार्थिनींना सांगितले.
भोंडला (२१ ऑक्टोबर )
नवरात्रातील भोंडला याच दिवशी साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी आवडीचा पोशाख परिधान करून, हादग्याची गाणी गात, खिरापतीचा आस्वाद घेत भोंडल्याचा आनंद लुटला.
शैक्षणिक सहली
सहली यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. मा. मुख्याध्यापिका श्रीम. सुरेखा ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहल विभागाने अत्यंत काटेकोर नियोजन केलेले होते. विद्यार्थिनींची शिस्त व सर्व सहकारी शिक्षकांचे सहकार्य यामुळे नियोजनाची अचूक अंमलबजावणी करता आली.
सर्वच पर्यटनस्थळांवर विद्यार्थिनींची शिस्त वाखाणण्याजोगी होती. इतर पर्यटक कौतुकाने शाळेची चौकशी करत होते. सर्व ठिकाणांची माहिती हेऊन, पर्यटनाचा आनंद पुरेपूर उपभोगून विद्यार्थिनींनी सहली आपल्या आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवल्या.
सन २०१५-१६ या वर्षातील शैक्षणिक सहलींचे आयोजन खालील प्रमाणे करण्यात आले होते.
वार | दिनांक | इयत्ता | ठिकाण |
शुक्रवार | १८ / १२ / २०१५ | ७ वी | कण्हेरी मठ, पन्हाळा किल्ला |
शनिवार | १९ / १२ / २०१५ | १ ली २ री | एम्प्रेस गार्डन लेखा फार्म |
सोमवार | २१ / १२ / २०१५ | ६ वी | सज्जनगड, ठोसे घर, चाळकेवाडी |
मंगळवार | २२ / १२ / २०१५ | ३ री, ४ थी | शिवनेरी, ओझर |
बुधवार | २३ / १२ / २०१५ | ५ वी | महाड, पाली, उन्हेरे, अलिबाग |